केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री माननीय मुरलीधर मोहोळ यांची भेट

महाराष्ट्रातील विमानतळ व विमान सेवा सक्षमीकरण करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ*
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या भेटी प्रसंगी माहिती
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सध्या कार्यरत असलेले विमानतळ, नवीन प्रस्तावित विमानतळ यांच्या विस्ताराबरोबरच विमान सेवा व विमान मार्गांचा विस्तार करून महाराष्ट्रातील एकूण विमानसेवांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या प्रश्नासंबंधी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आज केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधर मोहोळ यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते.
लवकरच यासंबंधी चेंबरच्या पदाधिकाऱ्यां समवेत संयुक्त बैठक घेऊ अशी ग्वाहीही मंत्री महोदयांनी दिली. आगामी कुंभमेळ्याचा विचार करून नाशिक मधील विमानसेवांचा जास्तीत जास्त विस्तार करावा आणि देशातील सर्व प्रमुख शहरे नाशिकशी विमानसेवेने जोडावी अशी मागणी ललित गांधी यांनी यावेळी केली
सोलापूर विमानतळ पूर्णपणे तयार असून या विमानतळावरून तात्काळ विमान सेवा सुरू करण्याची व या विमानतळाला भारतातील विमान निर्मिती उद्योगाचे जनक व सोलापूरचे सुपुत्र शेठ वालचंद हिराचंद यांचे नाव देण्याची आग्रही मागणी ललित गांधी यांनी यावेळी केली.
कोल्हापूर विमानतळावरून नवीन मार्ग सुरू करणे कोल्हापूर-दिल्ली, कोल्हापूर-जोधपुर या नवीन मार्गांची मागणी सुद्धा यावेळी सादर करण्यात आली. त्याचबरोबर धावपट्टी विस्तारीकरणाचे काम गतीने पूर्ण करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. सोलापूर विमानतळावरील विमान सेवा लवकरात लवकर सुरू करू अशी ग्वाही नामदार मोहोळ यांनी यावेळी दिली. अमरावती व रत्नागिरी विमानतळ सुद्धा लवकरात लवकर सुरू करावेत असा प्रस्ताव ललित गांधी यांनी सादर केला.
तसेच कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी ललित गांधी यांनी केली. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कौशल्य विकास समितीचे चेअरमन संदीप भंडारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन: केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना महाराष्ट्रातील विमानसेवा संबंधी निवेदन देऊन चर्चा करताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष ललित गांधी सोबत संदीप भंडारी.